नागपूर : शास्त्रीय नृत्य परंपरेत भारतीय आणि दक्षिणात्य नृत्यशैलीत विविध प्रकार असून त्यात प्रत्येक नृत्याची वेगळी शैली आणि परंपरा आहे. नागपुरात शहरातील विविध नृत्य शाळेतील १३५ कलावंत १२ तास अखंडपणे कथक, भरतनाटयम, मोहिनीअट्टम, ओडीसी, कुचीपुडी आदी शास्त्रीय नृत्य प्रकार सादर करणार असून त्याची सुरुवात रविवारी सकाळपासून झाली आहे. एक आगळावेगळा उपक्रम सादर करत दिवसभर अखंड घुंगरूचा नाद करणार आहे.
धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे ‘अखंड घुंगरू नाद-२०२३’ या शास्त्रीय नृत्य सोहळ्याला आज सकाळपासून सुरुवात झाली. विनायकराव फाटक स्मृती सभागृह, धरमपेठ म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सलग १२ तास म्हणजेच सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १३५ कलाकार शास्त्रीय नृत्य सादर करणार आहे. यात १२ वर्षांच्या युवतीपासून ७० वर्षांपर्यंत महिलांचा समावेश राहणार आहे.
हेही वाचा – बुलढाणा : देशातील एकमेव जगदंबा उत्सवास थाटात प्रारंभ; ११५ वर्षांची वैभवशाली परंपरा
सकाळपासून नृत्याविष्कार पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. एरवी एखाद्या संगीत समारोहात अर्धा किंवा एक तास नृत्य सादर केले जात असताना आता सलग बारा तास रसिकांना नृत्याविष्काराचा आनंद घेता येणार आहे.