नागपूर : साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची गर्दी नको, अशी भूमिका यापूर्वीच्या विविध संमेलनांमध्ये अनेक साहित्यिकांनी मांडली असली तरी अखिल भारतीय मराठी संमेलनांच्या ९७ वर्षांच्या इतिहासात एखाद दुसरा अपवाद वगळता इतर सर्व संमेलनांना राजाश्रयाचा मोह नाकारता आला नाही. दिल्ली येथे प्रस्तावित संमेलनात तर या परंपरेचा कळस गाठला जाण्याची शक्यता आहे. कारण, येथे तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रात तब्बल १५ वर मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. या दोघांसोबतच उद्घाटनीय सत्राच्या मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
याशिवाय ज्यांची या संमेलनात मुलाखत घेतली जाणार त्यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संमेलनाच्या समारोपालाही मंचावर राजकीय तारांगण अवतरणार आहे.
राजकारण्यांचा सन्मान, सारस्वतांची उपेक्षा
संमेलनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना रेल्वेच्या केवळ स्लीपर श्रेणीचे एकतर्फी भाडेही रेल्वे मंत्रालयाने माफ करू नये हे क्लेशदायक आहे. महाराष्ट्र सदन नि:शुल्क देण्याच्या जशा सूचना दिल्या त्याच धर्तीवर साहित्यिकांच्या एका बाजूच्या प्रवेश भाड्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा सन्मान आणि ज्यांच्यासाठी हे संमेलन आहे त्या सारस्वतांची उपेक्षा होत असेल तर ते योग्य नाही.
श्रीपाद भालचंद्र जोशी, पूर्वाध्यक्ष, साहित्य महामंडळ