नागपूर : ‘‘दिल्ली येथे प्रस्तावित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महत्त्वाच्या ठिकाणांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांची नावे देण्यात यावी. तसे न झाल्यास संघर्ष अटळ आहे’’ अशा शब्दात धमकी देणारे फोन साहित्य संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहदला येत आहेत. संमेलनाची तयारी ऐनभरात असताना व उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता असताना अशा धमक्यांचे सत्र सुरू झाल्याने आयोजक संस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

१९ डिसेंबर रोजी दिल्लीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी.डी. देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची छायाचित्रे आहेत. परंतु, यात सावरकर का नाहीत, अशी विचारणा करणारे फोन व लघुसंदेश सरहद या संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना जात आहेत. वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन केले जात असून या संमेलनाशी तसा थेट संबंध नाही ती माझी पत्नी व भावालाही याबाबत विचारणा केली जात असल्याचे नहार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

हे ही वाचा… पोलीस हवालदाराने पत्नीच्या प्रियकराच्या गाडीत ठेवले काडतूस; पण झाले उलटेच…

शरद पवारांपुढे नवीन पेच?

शरद पवारांना याआधी अनेकदा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती विविध आयोजक संस्थांनी केली होती. परंतु, पवारांनी ती विनंती विनम्रतेने नाकारली. दिल्लीतील संमेलनाबाबत मात्र त्यांनी आयोजकांच्या विनंतीवरून पुढाकार घेतला. संमेलनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज बुलंद व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु, या धमक्यांमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने पवार काय भूमिका घेतात, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा… शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

दिल्लीतील साहित्य संमेलनातील महत्त्वाच्या ठिकाणांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, असे भ्रमणध्वनी आम्हाला मोठ्या प्रमाणात येत आहेत. दोन जणांनी गोडसे याचाही यथोचित सन्मान करण्याबाबत आग्रह धरला. मी त्यांना त्यांचे म्हणणे लेखी देण्याची विनंती केली आहे. तसाही हा विषय महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. आमची जबाबदारी केवळ व्यवस्था पाहणे इतकीच आहे.- संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था, पुणे.

Story img Loader