नवी दिल्ली : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. या संमेलनासाठी मोदी काही वेळातच दिल्लीच्या विज्ञान भवनात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सध्या प्रवेश द्वारावर थांबले आहेत. मोदींच्या स्वागताला शिंदे थांबल्याचे बघून महाराष्ट्रातून दिल्लीत आल्येल्या मराठी साहित्य रसिकांकडून आश्चर्य व्यक्त केली जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने काही वेगळी राजकीय समीकरणे निर्माण तर होणार नाही, अशीही एक प्रश्नार्थक चर्चा विज्ञान भवनात सुरू आहे.
दरम्यान, दुपारी ५ वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन हाेणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान असतील. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर राहतील. यावेळी मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील.सरहद’ संस्थेकडून आयोजित या संमेलनात सुमारे १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.