नागपूर : आधुनिक पद्धतीच्या लोककलेचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेतील कार्यक्रमात बाईने कपाळाला कुंकू लावणे कसे आवश्यक आहे, त्याला विज्ञानाची शास्त्रीय जोड कशी आहे हे सांगण्यात आले. परंतु, कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे. लग्न झालेल्या बायकांना की विधवांना?. कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. मग विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार असू तर या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय?. त्यामुळे याला आम्ही ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, म्हणणार का? असा प्रश्न करत विज्ञानाच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या की, आज ज्या पध्दतीने माणसांचे जीवन चालले आहे, त्या पध्दतीमध्ये ‘‘जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरुनी टाका’’ असा प्रकार दिसतो. परंतु, असे एकीकडे म्हणायचे आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विशेषतः लोकांना निरनिराळ्या कर्मकांडात गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. त्याच्यामध्ये ‘तथाकथित’ शिक्षित स्त्रिया, मी ‘तथाकथित’ म्हणते मी ‘सुशिक्षित’ म्हणत नाही. तथाकथित शिक्षित स्त्रिया त्याच्यामध्ये अडकतात. लोकसंस्कृतीतल्या आणि संत स्त्रियांनी जेवढा विचार केला, स्वतःच्या जगण्याचा तेवढा विचार या शिक्षित बाया करीत नाहीत. स्वतःला पदवीधर म्हणवतात, उच्चशिक्षित म्हणवतात परंतु, आपण हे का करतो आहोत हे कर्मकांड, या कर्मकांडाचा विचार करत नाहीत असे दिसते. विधी श्रध्देने केला जातो आणि ज्यावेळेला ज्या विध्यात्मकतेतली श्रद्धा बाजूला होते. त्यावेळेला जे उरतं नुसतं कर्म केलं जातं. नुसते विधी केले जातात त्याला कर्मकांड असं म्हणतात. की नुसतं करत रहायचं ते अमुक करा, तमुक करा, तमुक करा आणि मग त्याला ‘साइंटिफिक रिझन देण्याचा प्रयत्न करायचा’ असा प्रकार सुरू आहे. छद्म विज्ञान म्हणजे आता लोककलांच्यामध्ये सुध्दा ही भानगड आलेली दिसते आहे, असे संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर म्हणाल्या. पुढे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, बायकांनी कपाळाला कुंकू का लावावं हा नवा प्रकार दिसतो. परवा मी लोककलांचा एक कार्यक्रम पाहिला. आधुनिक पद्धतीनं लोककला कवणाऱ्या एका संस्थेमधल्या एका मुलीने गोंधळ सादर केला. त्या गोंधळाचं गाणं आणि त्याच्यामध्ये तिने असं समर्थन केलं की बाईनी कपाळाला कुंकू लावणे हे कसे आवश्यक आहे. त्याला विज्ञानाची शास्त्रीय जोड दिली. ती वैज्ञानिक कारणे काय? तर बायकांना फार मानसिक त्रास असतो. कपाळाला इथे मधोमध दोन भुवयांच्यामध्ये दाब बिंद असतो त्या असतो दुवर कुंकवामुळे दाब पडतो आणि त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ हे सुरळीत होतं. त्या मुलीचं सगळ ऐकल्यावर नंतर मी प्रश्न विचारला. ठीक आहे, त्या कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक स्वास्थ ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे. लग्न झालेल्या बायकांना का विधवांना? विधवांना जास्त गरज आहे. कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. तर विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार. मग या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय आहे? मग याला आम्ही काय म्हणणार? विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात असा आरोपही संमेलनाध्यक्षांनी केला.
आर्थिक संपन्न, सामाजिक दर्जा असणाऱ्यांचे मेंदू काम करत नाही
वैज्ञानिक सत्य कसं आहे, हे ठासून सांगायचा उद्योग चालू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ‘तथाकथित’ शिक्षित समाज याला बळी पडतो आहे, हा उलटा प्रवास सुरू झाला आहे, तो चिंताजनक आहे. अरे जर त्या बायकांचं स्वास्थ टिकायचं असेल तर विधवांना जास्त गरज आहे. त्यांना तुम्ही कुंकू लावायची परवानगीच देत नाही. बरं स्त्रियांना जर मानसिक अस्वास्थ असेल तर पुरुषांचं काय ? सगळे पुरुष मानसिकदृष्ट्या स्वस्थ असतात का?. तर नाही. आपण ज्याला ‘सायंटिफिक रिझन’ देतो म्हणतो, वैज्ञानिक सत्य म्हणतो, त्याच्या पाठीमागच्या अप्रबुध्दपणाकडे आमचं लक्षच नाही. ते आंधळेपणान त्याचं आचरण चाललेलं आहे. तथाकथित उच्चशिक्षित स्त्रिया हे अत्यंत आंधळेपणाने करतायत असं मला सगळीकडे दिसते. एखाददुसरी असेत वेगळी, परंतु बहुसंख्य ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे आणि त्यांचे मेंदू काम करीत नाही. यांचे मन आणि मेंदू हे मोकळे करायला पाहिजेत अशा शब्दात टीका केली.