वर्धा : येथील स्वावलंबी विद्यालयाच्या पटांगणावर ३, ४ व ५ फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. संमेलनस्थळासाठी वीस लाख वर्गफूट जागेचे नियोजन करण्यात आले असून खवय्यांसाठी ‘खाऊ गल्ली’ हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
२३ एकरातील वीस लाख वर्गफुटात विविध व्यवस्था केल्या जाणार आहेत. मुख्य सभामंडप सात ते साडेसात हजार आसन क्षमतेचा राहणार असून त्यातच उद्घाटन व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. उपमंडप सातशे आसन क्षमतेचा असून त्यात विविध उपक्रम होतील. गजल, कवी असे पाचशे ते सातशे आसन क्षमतेचे अन्य पाच मंडप राहतील.
ग्रंथ प्रदर्शनीसाठी सर्वांत मोठा भूभाग राखून ठेवण्यात येत आहे. साडेतीन लाख वर्गफुटात तीनशे स्टाॅल लागतील. त्याला लागूनच प्रकाशकांच्या दोनशे मालवाहू गाड्यांची व चालकांच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे. सर्वसामान्य साहित्य संस्था प्रतिनिधींच्या जेवणाची व्यवस्था सव्वाचार लाख वर्गफुटात तर महत्त्वाच्या व्यक्तींच्या जेवणाचा मंडप चाळीस हजार वर्गफुटात साकारेल. मान्यवरांच्या जेवण मंडपातील प्रवेश काटेकोरपणे पाळल्या जाण्याबाबत विशेष दक्षता घेतल्या जाणार आहे.
जेवणासोबतच मान्यवर साहित्यिक मुलाखत किंवा भेट देऊ शकतील, अशा पैलूने नियोजन होणार. व्ही.आय.पी.वाहनतळ दीड लाख वर्गफुटात तर इतर निमंत्रितांचा तीन लाख वर्गफुटात करण्याचे नियोजन आहे. सर्वसामान्य रसिकांची वाहन व्यवस्था संमेलनस्थळापासून काही अंतरावरील लोक विद्यालयाच्या प्रांगणात असेल.संमेलनस्थळीच ‘खाऊ गल्ली’ म्हणून साठ हजार वर्गफुटात दर्दी खवय्यांची व्यवस्था करण्याचे ठरत आहे. या ठिकाणी विविध प्रादेशिक भागातील व्यंजने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. संमेलनस्थळाला लागूनच दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचे चोवीस तास आरोग्य सेवा देणारे आरोग्य केंद्र तयार केले जाणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा म्हणून १२० किलोवॅटचे सहा जनरेटर ठेवले जाणार आहेत.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचे चोपदार गर्दीत धक्का लागून पडले खाली, शिंदे यांनी केली विचारणा…
या सर्व तयारीचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले घेत आहेत. जिल्हा प्रशासन व संमेलन आयोजक यातील दुवा म्हणून काम पाहणारे अभियंता महेश मोकलकर हे सांगतात की, संमेलनस्थळाच्या विविध भागांची कागदोपत्री आखणे पूर्ण झाली आहे. मोठी जागा व्यापणाऱ्या ग्रंथदालन परिसराचा आकार वर्तुळाकार की आयताकृती घ्यायचा, याबद्दल चर्चा सुरू आहे. संमेलनस्थळी एकही वास्तू नसल्याने विशाल मंडपातच सर्व उपक्रम घेण्याचे आव्हान आहे. मात्र, ते लिलया पार पाडू, असा विश्वास मोकलकर व्यक्त करतात.