अकोला : जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून वाढलेल्या जागा लक्षात घेता यंदा १० हजारावर जागा रिक्त राहण्याची चिन्हे आहे. अकरावीमध्ये प्रवेश घेताना विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा दिसून येत आहे. गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दहावी उत्तीर्ण कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षणातील महत्त्वाचा दहावीचा टप्पा ओलांडल्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० जूनला गुणपत्रिका मिळाल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाची प्रक्रिया राबवली जात आहे.

हेही वाचा – नागपूर : उड्डाणपुलानंतरही उमरेड मार्गावरील वाहनांची वर्दळ कायम, सक्करदरा चौकाला…

यंदा जिल्ह्यात २४ हजार २१९ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले. परीक्षेत प्रविष्ट १३ हजार ६६ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाले, तर १२ हजार ४३ विद्यार्थिनींपैकी ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात अकरावीच्या एकूण ३४ हजार ७०० जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांपुढे अनेक महाविद्यालयांचे पर्याय उपलब्ध असतील. माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात वेळापत्रक जाहीर केले.

ऑफलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात २६५ कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ३४ हजार ७०० जागा उपलब्ध आहेत. १० जूनपासून प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्ह्यात यावर्षी देखील गुणवत्तेच्या आधारावर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अनुदानित तुकड्यांवरील विद्यार्थी प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यानंतर विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश अर्ज वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध शाखा उपलब्ध असून अधिकाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळत आहेत.

विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा

जिल्ह्यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १५ हजार ७४२ जागा असून त्याखालोखाल कला शाखेच्या १३ हजार ००२ जागा आहेत. वाणिज्य शाखेच्या तीन हजार ९३०, तर इतर एक हजार ४९० जागा आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील चढाओढ लागली आहे.

हेही वाचा – नागपूर : महाविद्यालयीन तरुणी देहव्यापारात; स्पा, सलून, ब्युटी पार्लरच्या आड…

शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गुणवत्तेनुसार येत्या एक-दोन दिवसांत यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश होणार आहेत. विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला प्रथम पसंती आहे. – डॉ. विजय नानोटी, प्राचार्य, श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola 10000 seats will remain vacant for 11th class what exactly is the reason ppd 88 ssb