अकोला : विविध पोलीस ठाण्यांत दाखल ४१ गुन्ह्यांमध्ये तब्बल १६५ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अकोला पोलिसांनी कठोर भूमिका घेत जप्त अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ते जाळून नष्ट केले.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायदा १९८५ प्रमाणे गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्त मुद्देमाल गांजा, अफू, चरस, एमडी आदी अंमली पदार्थाची सुरक्षा व साठवणूक करण्यासाठी अकोला पोलीस मुख्यालयात गोदाम तयार करण्यात आले. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत कारवाईमध्ये जप्त अंमली पदार्थ गोदामामध्ये जमा केले जातात. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी प्रलंबित अंमली पदार्थ मुद्देमालाचा आढावा घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यात दाखल ४१ गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थाचा मुद्देमाल विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

४१ गुन्ह्यातील अंमली पदार्थ मु‌द्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली. दिल्ली येथील जीओएएफचे मुख्य नियंत्रक यांची सुद्धा परवानगी घेण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ येथे अंमली पदार्थ विल्हेवाट समितीचे सदस्य तथा अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, दोन शासकीय पंच, अकोल्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी महेश भिवापुरकर, कंपनीचे युनिट हेड प्रशांत मस्के आदींच्या उपस्थितीमध्ये ४१ गुन्ह्यातील जप्त १६५ किलो १२० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ‘रोटरी ईन्सिनरेटर’ मध्ये जाळून नष्ट करण्यात आला आहे.

अंमली पदार्थाची तस्करीची मोठी समस्या

अंमली पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यांचा बेकायदेशीर वापर केला जातो आणि त्यांची तस्करी केली जाते. अंमली पदार्थांच्या तस्करी आणि बेकायदेशीर वापराशी लढा देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग काम करतो. अंमली पदार्थाची तस्करी मोठी समस्या म्हणून समोर आले आहे. चोरीच्या मार्गाने ही तस्करी केली जाते. यावर आळा बसण्यासाठी पोलिसांकडून नियमित कारवाईची मोहीम राबविण्यात येते. जप्त अंमली पदार्थाची विल्हेवाट लावण्याची मोठी प्रक्रिया असते. ती पूर्ण करून अकोला पोलिसांनी तब्बल १६५ किलो अंमली पदार्थ नष्ट केले आहे.