पोलीस भरतीचा सराव एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची घटना अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणावर घडली. २२ वर्षीय तरुणी धावताना क्रीडांगणावरच कोसळली. यात तिचा मृत्यू झाला. रोशनी अनिल वानखडे (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे.
अकोला तालुक्यातील ग्राम धोतर्डी येथील रहिवासी रोशनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या बहिणीकडे शहरातील रणपिसे नगर भागात राहत होती. रोशनी पोलीस भरतीची तयारी करीत होती. तिचा शहरातील वसंत देसाई क्रीडांगणावरील मैदानावर शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव सुरू होता.
धावण्याच्या सरावादरम्यान रोशनी चक्कर येऊन कोसळली. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. रोशनीच्या मृत्युमुळे कुटुंबीय व मैदानावर सराव करणाऱ्यांना धक्का बसला आहे. रोशनीचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.