अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँक खाते ‘आधार सिडिंग’ असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक महिलांनी आपले खाते ‘आधार सिडिंग’ असल्याची खातरजमा करून घेतल्यास अडथळा येणार नाही. अकोला जिल्ह्यात बँक खात्याला आधार सिडिंग नसलेल्या ४५ हजार ७२४ अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारे सूचना देण्यात आली असून, सर्व संबंधितांना तत्काळ बँक खात्यात आधार सिडिंग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने पाठपुरावा होत आहे. योजनेच्या लाभासाठी अर्जदार महिलांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे ‘आधार सिडिंग’ आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक असते. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी ही बाब अनिवार्य आहे. बँक खाते ‘आधार सिडिंग’ नसलेल्या ४५ हजार अर्जदारांना संदेश पाठविण्यात आला आहे. संबंधितांनी आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन ‘आधार सिडिंग’ करून घ्यावे. योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. सर्व पात्र लाभार्थींना जुलैपासून दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात योजनेचे सध्या दोन लाख ५७ हजार ५२९ अर्जदार पात्र आहेत. तांत्रिक त्रुटी आलेल्या अर्जाची युद्धपातळीवर पूर्तता करून घेण्यात येत आहे. अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा प्रयत्न असून बँक खात्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा…एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून काँग्रेस आक्रमक, आयोग म्हणाले परीक्षा पुढे….
अडीच लाखाहून अधिक लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक महिला आज पात्र ठरल्या असून, योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होत आहे. अनेकांच्या खात्यात यापूर्वीच हा लाभ पोहोचला. त्याबद्दल अनेक महिलांनी आज आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक महिलांची उपस्थित राहून मुख्य सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी अधिकाऱ्यांसह योजनेचे विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिना जमा होत असल्याने अनेक लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ३१ ऑगस्टपर्यंत योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे.