अकोला : नियम मोडणाऱ्या वाहनांवरील दंडाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.जिल्ह्यातील ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटींचा दंड थकीत आहे. वाहनांवर दंड चढल्यावर देखील तो भरण्याकडे वाहनधारकांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता दंड भरण्यासाठी न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आली असून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण चार लाख ८१ हजार २३३ वाहनधारकांवर एकूण २३ कोटी ७८ लाख ६९ हजार ८०७ रुपयांचे ‘ई-चलान’ दंडाची रक्कम थकबाकी आहे. दंडाची ही रक्कम मिळण्यास वाहनधारकांनी कायम टाळाटाळ केली. त्यामुळे आता दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. वाहनावरील दंड परिवहन संकेतस्थळावर तपासता येऊ शकतो. वाहनाचा क्रमांक टाकल्यास प्रलंबित ‘ई-चलान’ची माहिती प्राप्त करून घेता येईल. १४ डिसेंबरला नियोजित लोक अदालतमध्ये दंडाच्या रक्कमेचा निपटरा करण्यासाठी न्यायालयाकडून एक लाख १६ हजार ४८७ वाहनधारकांना नोटिस बजावण्यात आली आहे. एकूण तीन लाख आठ हजार ३२० वाहनांवरील प्रलंबित दंड १६ कोटी ६२ लाख ५७ हजार २५० रुपये आहे. प्रलंबित चलान रक्कम असलेल्या वाहनधारकांना लोकअदालतमध्ये दंडाचा भरणा करता येणार आहे. १४ डिसेंबर पूर्वी कोणत्याही वाहतूक पोलिसाकडे देखील दंडाचा भरणा करता येईल. प्रलंबित ‘ई-चलान’ भरणा करण्यासाठी वाहनधारकांना एस.एम.एस. पाठवून सुचना देखील देण्यात आली. वाहनांवरील प्रलंबित दंड बाकी असल्याने न्यायालयाची नोटीस प्राप्त झाल्यावर देखील त्याचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा…गोंदिया : प्रफुल्ल पटेलांच्या गृहजिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार?
ग
…तर घरी येऊन पोलीस करतील दंड वसुली
वाहनधारकांनी नियमांचे पालन करून त्यांचे वाहनांवरील प्रलंबित जुना दंड त्वरित भरून घ्यावा. न्यायालयाच्या नोटीसनंतरही प्रलंबित दंड भरला गेला नाही, तर पोलीस विभागाचे पथक त्या वाहनधारकांच्या रहिवासी पत्त्यावर जाऊन दंड वसुलीची विशेष मोहीम राबविणार आहे. त्यासाठी पोलीस ठाणे निहाय विशेष पथक तयार करण्यात आले असून मोहिमेंतर्गत प्रलंबित दंड वसुली करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा…नागपूर : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी; पाच वर्षात ३०२
नागरिकांनी जागरुक राहून त्यांचे वाहनावरील प्रलंबित ‘ई-चलान’ दंडाची रक्कम शासन जमा करावी. दंड वसुलीसाठी पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. बच्चन सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला.