अकोला : जिल्ह्यात अपघाताच्या मालिकेनंतर परिवहन व पोलीस विभागाला जाग आली आहे. परिवहन व पोलीस विभागाने नियमबाह्य वाहतुकीविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली. परिवहन विभागाने ७७ वाहनचालकांवर कारवाई केली, तर पोलिसांनी ७४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले. जिल्ह्यातील अपघाताच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार व प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
हेही वाचा – नागपुरातील सर्व रस्ते, चौक फलकमुक्त करा; ग्राहक पंचायत म्हणते…
पातूर, बाळापूर मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात आली. विनाहेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणे, अति वेगाने वाहन चालवणे आदी नियमभंग करणाऱ्या ३५ हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहनधारकांना समुपदेशनही करण्यात आले. याशिवाय वाशिम बायपास, निमवाडी, अशोक वाटिका चौक, बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसर, राधाकृष्ण प्लॉट परिसर, नेहरू उद्यान चौक, अशोक वाटिका उड्डाणपूल, गांधी रस्ता आदी ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ४२ दोषी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. रहदारीच्याविरुद्ध दिशेने वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, विमा अद्ययावत नसणे, रहदारीस अडथळा निर्माण करून धोकादायक पद्धतीने अवैध ठिकाणी वाहन पार्किंग करणे आदी बाबी आढळून आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यपी वाहनचालकांवर कलम १८५ मोवाका अन्वये कारवाई करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १२ ते १९ मेदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती. शहर वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून मद्यपी ७४ वाहन चालकांवर काारवाई करून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नमूद सर्व प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा – उत्तर प्रदेशमधून हरवलेला मूकबधिर मुलगा बाळापूरमध्ये सापडला, असा लागला कुटुंबीयांचा शोध
महामार्गावर त्रुटी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ मूर्तिजापूर वळणमार्गावरील वर्तुळाकार सर्विस मार्गावर विरुद्ध दिशेने वाहने चालत असल्याने संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. ही त्रुटी लवकर दूर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महामार्ग बांधकाम यंत्रणेला दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या स्थळाची पाहणीही केली.