अकोला : अकोला व वाशीम जिल्ह्याच्या पालकत्वाचा भार कुणाच्या खांद्यावर पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळातील दोन्ही जिल्ह्यातील आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यातील मंत्र्यांवरच दोन्ही जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी राहील. पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

अकोला व वाशीमची जिल्ह्याची मंत्रिपदावरून कायम उपेक्षा होते. या भागातील लोकप्रतिनिधींना मंत्रिपद देण्यात विचार होतांना दिसत नाहीत. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यातील डॉ. रणजीत पाटील यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली होती. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा कायम आहे. मध्यंतरी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली. जिल्ह्याला मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत अकोला, वाशीम जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर काहींनी विजयाचा चौकार देखील लगावला. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मंत्रिपदासाठी अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. मंत्रिपदाऐवजी भाजप पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची वर्णी लागली. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सलग विजयाचा चौकार लगावला. अकोट मतदारसंघात विजयी होण्याची प्रकाश भारसाकळेंनी हॅट्ट्रिक केली. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. वाशीम जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले. त्यामुळे वाशीम जिल्ह्याला मंत्रिपदाची शक्यता नव्हतीच.

हेही वाचा : Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

पाच वर्षांपासून अकोला जिल्ह्यात स्थानिक मंत्री नाहीत. मविआ सरकारमध्ये बच्चू कडू, तर महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाले पाहिजे, अशी नागरिकांची आग्रही भूमिका होती. मात्र, प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. पश्चिम वऱ्हाडात एकमेव मंत्रिपद खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना मिळाले. अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी फुंडकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब फुंडकर अकोल्याचे खासदार राहिले आहेत. वाशीम जिल्ह्याला गेल्या काही वर्षांमध्ये शंभूराज देसाई व संजय राठोड पालकमंत्री म्हणून लाभले होते. आता पुन्हा पालकमंत्री पदासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा असतांना त्यांना शिवसेना पक्षातूनच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला, तर काही पदाधिकारी समर्थनार्थ समोर आले आहेत. मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात संजय राठोड यांच्या संभाव्य पालकमंत्री पदावरून शिवसेनेतच दोन मतप्रवाह आहेत. आता पालकमंत्र्यांची नियुक्ती होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

हेही वाचा : बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार

फॉर्म्युल्याला अपवाद?

अकोला जिल्ह्यात तीन, तर वाशीम जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार निवडून आले आहेत. जिल्ह्यात ज्या पक्षांचे जास्त आमदार, त्यांचे पालकमंत्री, असा महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याचे बोलल्या जाते. अकोल्याला भाजपचेच पालकमंत्री लाभतील. मात्र, वाशीम जिल्ह्यात भाजपचे आमदार असतांना पालकमंत्री शिवसेनेचा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशीम जिल्हा महायुतीच्या फॉर्म्युल्याला अपवाद ठरू शकतो.

Story img Loader