अकोला : तडीपारीची कारवाई टाळण्यासाठी दारू विक्रेत्याकडे चक्क पाच हजारांची लाच पोलिसानेच मागितली. या प्रकरणात पातूर येथील पोलिसाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडले. पातूर पोलीस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली. पवन सुनील भाकरे, (३६, पोलीस शिपाई, पातूर पोलीस ठाणे, रा. वसंत नगर मानोरा, जि. वाशीम) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
तक्रारदारावर पातूर पोलीस ठाण्यात यापूर्वी देशी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदारांनी सध्या दारू विक्रीचा अवैध व्यवसाय बंद करून मोलमजुरी सुरू केली. आरोपी पोलिसाने तक्रारदाराला मागील गुन्ह्याच्या अभिलेखावरून तडीपारीची कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार २० फेब्रुवारी रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली. या तक्रारीवरून पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आरोपी पोलिसाने पाच हजाराची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांच्या लाच रक्कमेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्याने तीन हजार रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली होती. आज पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. आरोपी पोलीस पवन सुनील भाकरे याने तक्रारदाराकडून लाचेची तीन हजार रुपयांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या रक्कमेसह आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरूद्ध पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक भारत जाधव, पो.ह. दिगांबर जाधव, पोलीस अंमलदार उपेंद्र थोरात, संदिप ताले, किशोर पवार, पो. हवा चंद्रकांत जनबंधु आदींच्या पथकाने केली. नागरिकांनी अशा प्रकारे भ्रष्टाचारासंबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे.
नव्या वर्षात महाराष्ट्रात लाचेचे १०५ गुन्हे
लाचखोरीचे प्रमाणत दिवसेंदिवस वाढत असून नव्या वर्षांतील दीड महिन्यात राज्यात तब्बल १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वाधिक २५ गुन्हे पुणे परिक्षेत्रात दाखल झाले. त्याखालोखाल नाशिक २१, नागपूर १३, छत्रपती संभाजीनगर ११, अमरावती व ठाणे प्रत्येकी १०, मुंबई नऊ व नांदेड परिक्षेत्रात सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या १०५ प्रकरणांमध्ये १५३ आरोपींवर कारवाई केली आहे.