दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना हिवरखेड येथे रविवारी दुपारी घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला आहे. कौटुंबिक कारणावरून हे प्रकरण घडल्याची चर्चा असून पोलिसांनी जखमी पतीच्या आई व भावाला ताब्यात घेतले आहे.
हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या स्वस्तिक कॉलनीमध्ये दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सत्यभामा शांताराम कंडारे (२८) यांचा मृत्यू झाला, तर शांताराव देविदास कंडारे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. घटनेनंतर दिव्यांग व्यक्तीची आई पुष्पा देविदास कंडारे व मोठा भाऊ विनोद देविदास कंडारे फरार होत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.