अकोला : अकोला जिल्ह्यातून तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यासाठी त्यांनी एका शासकीय पत्राचा आधार घेतला. या संदर्भात त्यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट केली आहे. या प्रकरणात ‘एसआयटी’मार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे एक हजार बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता अकोला जिल्ह्याकडे वळवला.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ : प्रदीप आंबरे राज्यात पहिला तर अमृता शिरके दुसरी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षेची गुणवत्ता यादी…

अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमातून केला आहे. तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंत्रालयात पाठविलेल्या पत्राचा त्यांनी आधार घेतला. बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीम अकोला, अमरावती जिल्ह्यांपर्यंत आलेच कसे, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातून जन्म प्रमाणपत्रांचा तपशिल महसूल व वन विभागाने मागवला होता. जन्म, मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. गृहविभाग अधिसूचना १० सप्टेंबर २०२३ नुसार अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म व मृत्यू नोंदणीचे अधिकार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. उशिरा जन्म- मृत्यू नोंदणीमध्ये जिल्ह्यात १५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार २७३ प्रमाणपत्र देण्यात आले असून, १०७ नामंजूर व चार हजार ८४४ प्रलंबित आहे.

हेही वाचा – गोंदिया : रात्री लग्नसमारंभातून निघाले अन् समोर दरोडेखोर उभे…

कायद्यातील सुधारणेनंतर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची चौकशी गृहविभागामार्फत विशेष तपासणी पथकाद्वारे करण्यात येणार आहे. त्याचे पत्र शासनाकडून सर्व जिल्ह्यांना प्राप्त झाले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली असून ‘एसआयटी’च्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola bangladeshi rohingya birth certificate allegation kirit somaiya ppd 88 ssb