अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केली. यामध्ये मूर्तिजापूर व कारंजा मतदारसंघांचा समावेश आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा हरीश पिंपळे यांच्यावरच विश्वास दाखवला, तर कारंजातून सई डहाकेंना उमेदवारी दिली आहे. २००९ पासून सलग तीनवेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले पिंपळे उमेदवारीसाठी प्रतीक्षेत होते. त्यातच राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यामुळे रवी राठी भाजपमध्ये दाखल झाले. पिंपळे यांची उमेदवारी कापली जाणार असल्याचा अंदाजामुळे आमदार पिंपळे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती.

अखेर पक्षाच्या तिसऱ्या यादीत पिंपळे यांना स्थान देण्यात आले. सलग चौथ्यांदा पिंपळे मूर्तिजापूरमधून निवडणूक रिंगणात राहतील. २०१९ मध्ये हरीश पिंपळे यांना वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी काट्याची लढत दिली होती. त्यामध्ये पिंपळे यांनी एक हजार ९१० मतांनी निसटता विजय मिळवला होता. आता हरीश पिंपळे यांच्यासमोर राष्ट्रवादी पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व वंचितचे डॉ. सुगत वाघमारे यांचे आव्हान राहील. मूर्तिजापूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

हेही वाचा – भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात

कारंजा बाजार समितीच्या सभापती, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या सई प्रकाश डहाके यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये शनिवारी प्रवेश घेतला. त्यांना आज भाजपकडून कारंजामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये कारंजा मतदारसंघ भाजपकडे असल्याने परस्पर समन्वयातून पक्षांतर व उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मूर्तिजापुरातून भाजपने अखेर विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनाच उमेदवारी जाहीर केली. सलग चौथ्यांदा ते भाजपकडून निवडणूक रिंगणात राहतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या सई डहाकेंना कारंजातून संधी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये परस्पर समन्वयाचा हा एक भाग असल्याचे बोलल्या जात आहे.

कारंजामध्ये भाजपविरुद्ध राष्ट्रवादी लढत

कारंजा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ज्ञायक पाटणी इच्छुक होते. भाजपच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच ॲड. ज्ञायक पाटणींनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला.

हेही वाचा – उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या….

राष्ट्रवादीने त्यांना कारंजामधून उमेदवारी देखील जाहीर केली. २०१९ मध्ये या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी व वंचित आघाडीत तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये दिवंगत राजेंद्र पाटणी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत राष्ट्रवादीचे दिवंगत प्रकाश डहाके यांचा २२ हजार ८२४ मतांनी पराभव केला होता. आता भाजपच्या सई डहाके विरुद्ध राष्ट्रवादीचे ज्ञायक पाटणी यांच्यात लढत होणार आहे.