अकोला : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर होताच अकोल्यात भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत गटनेता निवडीसाठी आमदारांच्या बोलवलेल्या बैठकीमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानिमित्ताने भाजपच्या बैठकीत अकोल्याला मानाचे स्थान मिळाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. १३२ आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिढा होता.

अखेर आज भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. सोबतच मुख्यमंत्री पदावर ते विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. गटनेता निवडण्यासाठी पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्जमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्रीपद कुणाला मिळणार… सलग दहा वर्षांपासून नागपूर…

या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बैठकीच्या सूत्रसंचालनाची मोठी जबाबदारी प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. आमदार रणधीर सावरकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास जिंकत त्यांनी वाहवा मिळवली. राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत जिल्ह्यातील आमदारांना मानाचे स्थान मिळाल्याने अकोलेकरांमध्ये अभिमानाची भावना आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर होताच शहरातील भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘फेईंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम…या भागाला तर थेट सतर्कतेचा इशाराच…

यावेळी जोरदार आतषबाजी, ढोल-ताश्याच्या गजरात परंपरागत नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लाडू, पेढे वाटून नागरिकांचे तोंड गोड करण्यात आले. खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमात माजी महापौर सुमन गावंडे, डॉ. किशोर मालोकार, संजय गोटफोडे, ॲड. देवाशिष काकड, गिरीश जोशी, दिलीप मिश्रा, रमेश अलकरी, संध्या लोकहकपुरे, चंदा ठाकूर, सारिका जयस्वाल, नितीन ताकवाले, विजय इंगळे, संजय बडोणे, कृष्णा शर्मा, आनंद बलोदे, पवन पाडिया, सागर शेगोकार आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader