अकोला : महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार अस्तित्वात होती. त्या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांपासून महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी यांनी केली. अकोट येथील काँग्रेस उमेदवार ॲड. महेश गणगणे यांच्यासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते. खा. इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपतील अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाषणात खासदार इमरान प्रतापगढी यांनी विरोधकांवर चौफेर टीका करून शेरोशायरी सादर केली.

पुढे ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक केवळ एक आमदार निवडण्याची आहे, असा आपला विचार असल्यास तो खूप लहान आहे. या निवडणुकीचे महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याचा निर्णय या निवडणुकीतील निकालावर अवलंबून राहील. ते ‘बटोंगे तो कटोंगे’ असे नारे देत समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. काँग्रेसने ‘नफरत कि बाजार में मोहब्बत की दुकान’ची भूमिका घेतली. द्वेष आणि प्रेमामधील हा मोठा फरक आहे.

हेही वाचा…उद्योगपतींसाठी आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या, प्रियंका गांधीचा भाजपवर आरोप

संसदेमध्ये जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा उचलल्यावर इतिहासात प्रथमच एका सोबत १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले. जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे त्यांना खपत नाही, अशी टीका देखील खा. प्रतापगढी यांनी केली. महायुतीने आपल्या घोषणापत्रात आश्वासनांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार नाही. महाराष्ट्रात मविआचे सरकार पुन्हा आल्यास महिलांना तीन हजार, तर तरुणांच्या खात्यात चार हजार रुपये टाकणार आहोत. राज्यातील शासकीय बसेमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास सुरू केला जाईल. रुग्णालयांतील अवाढव्य खर्चामुळे गरीब रुग्णांना उपचार करणे कठीण होते. शासकीय आरोग्य यंत्रणेची प्रचंड दूरवस्था झाली आहे.

हेही वाचा…राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचार गाडीची तोडफोड

या सर्व परिस्थितीत गरीब कुटुंबात कुणाला मोठा आजार झाला तर उपचारासाठी घर, दागिणे विकण्याची, जमीन गहाण ठेवण्याची वेळ येते. आपले सरकार येताच, प्रत्येक व्यक्तीला २५ लाख रुपयांचे विमा काढला जाईल. त्यामुळे आरोग्य उपचारासाठी कुणावर संकट येणार नाही. आम्ही विकासाची चर्चा करतो, समाजा-समाजामध्ये तेढ, द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करीत नाही, असा टोला देखील खासदार इमरान प्रतापगढी यांनी भाजपला लगावला.