अकोला : दुकानांचे ‘शटर’ तोडून मुद्देमालावर हात साफ करणाऱ्या आंतरराज्य कुख्यात टोळीला जेरबंद करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक व तेलंगणामध्ये १७ गुन्हे केले आहेत. बुलेट वाहन चोरत दुकानांचे शटर तोडणारी ही कुप्रसिद्ध गँग आहे. शहरातील अलंकार मार्केट येथे २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सात ते आठ बंद दुकानांचे शटर उचलून चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. पाच संशयितांनी शहरातील सात दुचाकी चोरी करून गुन्ह्यासाठी वापर केला होता. जुने शहर परिसरात देखील सात ते आठ बंद दुकानांमध्ये चोरी केली होती. त्या सात दुचाकींपैकी दोन बुलेट दुचाकी घेऊन चोरटे फरार झाले होते.

या घटनेचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून आरोपींना निष्पन्न केले. पथकाने पाच संशयितांचा अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पाठलाग केला होता. मात्र, ते फरार झाले होते. त्यावेळी पथकाने अमरावती (ग्रामीण) येथील आरोपी फरहान अहेमद अब्दुल गफ्फार याला अटक केली होती. आरोपीने त्याचे सोबत सुरेश नारायण (रेकुला रा. व्यंकटपुरा मैकाजीरी लोथेकुटा त्रिमुलगिरी हैदराबाद, तेलंगना), अशोक गंगाधर रेडडी (रा. हनुमंतपुरा अरूर, जि. बल्लापुर, कर्नाटका) हे दोघे असल्याची कबुली दिली होती. या दोन्ही आरोपींना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी अकोला जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांसह अमरावती (शहर), नागपूर ग्रामीण, वाशीम, हिंगोली जिल्ह्यातही बंद दुकानांमध्ये हात साफ केला आहे.

कर्नाटक व तेलंगणा राज्यात देखील या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही टोळी पोलीस कोठडीत असून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल जाधव, पोउपनि दशरत बोरकर, पोलीस अंमलदार गोकुळ चव्हाण, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन, उमेश पराये, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, स्वप्नील खेडकर, शेख अन्सार, लिलाधर खंडारे, चालक प्रशांत कमलाकर, मनिष ठाकरे, राहुल गायकवाड तसेच सायबर पोलीस ठाण्याचे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.

Story img Loader