अकोला : अकोला पोलीस दलात गुन्ह्यांच्या तपासाला आता अभ्यागत कक्षातून सुरुवात होणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्ष उभारण्यात येत असून त्यात अद्ययावत सेवा प्रणाली लागू केली जाणार आहे. तक्रारदारांच्या योग्य मार्गदर्शन व त्यांना सुविधा मिळण्याच्या दृष्टिने जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्यात २३ कक्ष मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलिसांची जबाबदारी असते. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणे असून चार उपविभाग आहेत. सुमारे १२५ पोलीस अधिकारी व अडीच हजार पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. दैनंदिन मोठ्या प्रमाणात नागरिक तक्रार, निवेदन व इतर कारणाने पोलीस ठाण्यात येत असतात. पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या नागरिकांना सुसह्य वाटावे व त्यांना योग्य सुविधा मिळण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अभ्यागत कक्ष उभारण्याची कल्पना समोर आली. त्यानुसार जिल्हा नियाेजन समितीतून प्रत्येक पोलीस ठाण्यात एक प्रमाणे २३ अभ्यागत कक्ष उभारणीला मंजुरी मिळाली. काही ठिकाणचे काम देखील पूर्ण झाले आहेत. सध्या अस्तिवात असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये दैनंदिन कामकाजासाठी सुविधा आहेत, मात्र ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी अभ्यागत कक्षाची निर्मिती केली जात आहे. जनतेच्या तक्रारीचे निवारणासाठी हे अभ्यागत कक्ष जनतेसाठी उपयुक्त ठरतील.
प्रथम अभ्यागत कक्षातून संवाद
पोलीस ठाण्यात आलेले नागरिक प्रथम अभ्यागत कक्षातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. समस्येच्या व अडचणीचे स्वरूपानुसार अभ्यागत कक्ष अधिकारी त्यांचे तक्रारीचे निवारण, मदत व मार्गदर्शन करतील. अभ्यागत कक्षामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्याचे दैनंदिन कामकाज करण्यास आवश्यक आवश्यक मूलभूत सुविधेसह अत्याधुनिक मोबाईल, टॅब आदी उपलब्ध करून दिले जाणार आहे. अभ्यागत कक्षात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था, कुलर, टी.व्ही, स्वच्छतागृह याची सुविधा उपलब्ध असेल.
कक्ष उपयुक्त व दिशादर्शक ठरणार
१० जानेवारीपासून मुख्यमंत्री कृती आराखडा योजना सुरू झाली आहे. यातील मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून अभ्यागत कक्षात जनतेच्या तक्रार निवारणा संबंधित अद्यावत सेवा प्रणाली सुरू करण्याचे नियोजित आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्ययावत अभ्यागत कक्ष हे निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.