अकोला : अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला कारवाईचे निर्देश दिले आहेत.
अकोला जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘सायबर फ्रॉड’ करणाऱ्यांनी आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या छायाचित्राचा देखील वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार +८५६२०९८३९२७४०, तसेच + ९१ ९३३२९३९१२८ या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे. आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नावे संदेश प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच, त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा…आमदाराच्या कुटुंबीयाच्या कारला भीषण अपघात….चिमुकलीसह सहा ठार….
या प्रकारचा संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ चौकशी, तसेच कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत. या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा खात्यावरून संदेश येताच, तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.