अकोला : लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केंद्राबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. युवा मतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसून आले. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २९.३१ टक्के मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी ११ वाजेपर्यंत १६.३४ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अकोला जिल्ह्यात सरासरी २९.८७ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये अकोट मतदारसंघात २८.७०, बाळापूर २८, अकोला पश्चिम ३२.०६, अकोला ३०.५४ व मूर्तिजापूर मतदारसंघात २९.६६ टक्के मतदान झाले. अकोला जिल्ह्यात खासदार अनुप धोत्रे, वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, रणधीर सावरकर आदींनी कुटुंबीयांसह आपला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील ४५ हजारांवर गोवारी मतदारांचा मतदानावर बहिष्कार; कारण…

वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघांमध्ये सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. प्रशासनाने त्याची दखल घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत केली. वाशीम जिल्ह्यात मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये सरासरी २९.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान ३३.७९ टक्के मतदान वाशीम मतदारसंघात झाले. रिसोड मतदारसंघात २९.४२ टक्के, तर सर्वात कमी २३.९९ टक्के मतदान कारंजा मतदारसंघामध्ये झाले आहे. आता शेवटच्या पाच तासात मतदानाची टक्केवारी किती वाढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळच्या सत्रात नागपूरकरांचे उत्साहपूर्ण मतदान, ७५ टक्के मतदानाकडे वाटचाल?

चिन्मयने दिला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा संदेश

शहरातील जठारपेठ भागातील रहिवासी दिव्यांग चिन्मय विनोद देव यांनी आज सकाळी ७ वाजताच महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा संदेश दिला. गृहमतदानाची सुविधा उपलब्ध असतानाही ती नाकारून थेट मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअरवर दाखल होत त्याने मतदान केले. प्रत्येकाने मतदान करून लोकशाही बळकट करण्यास मदत करावी, असे आवाहन चिन्मय याने केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola district recorded 29 87 percent polling while washim district 29 31 percent voting till 1 pm ppd 88 sud 02