सार्वजनिक गणशोत्सव मंडळांपुढे महागड्या विजेचे मोठे विघ्न आहे. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या विजेचे दर गेल्या दोन वर्षांपासून घरगुती वीज ग्राहकांप्रमाणे आकारण्यात येत आहे. २०१९ पर्यंत विजेच्या संपूर्ण वापरासाठी प्रतियुनिट ४.५५ रुपये लागणारा दर आता ५०० युनिटच्या वर १३.२१ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या विजेच्या खर्चात सुमारे तिप्पटीने वाढ होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी देण्यात येते. या सार्वजनिक उत्सवांमध्ये देखावे, मंडप, रोषणाई, विविध कार्यक्रम आदी भव्य-दिव्य प्रमाणात होत असल्याने विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महावितरणकडून २०१९ पर्यंत सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन आकार एकूण ४.५५ पैसे प्रतियुनिट वीजदर आकारण्यात येत होता. सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत होता. अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४.५५ रुपये दर लागत होता.

करोना काळात मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात आला असताना २०२० पासून महावितरणने सार्वजनिक उत्सवांना घरगुती वीज दर लागू केले आहेत. वीज वापऱ्याच्या टप्प्यानुसार मंडळांना प्रतियुनिटचे दर लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या विजेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी ४.७१ रूपये, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.६९ रुपये, ३०१ ते ५०० प्रति युनिट वीज वापरासाठी ११.७२ रुपये आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३.२१ रुपये दराने वीजपुरवठा देण्यात आला आहे. मध्यम व मोठ्या गणेशोत्सव मंडळांचा १० दिवसांतील विजेचा वापर हा ५०० युनिटपेक्षा अधिक होतो. त्यामुळे त्या गणेशोत्सव मंडळांना १३.२१ रुपये दर लागतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महागड्या विजेचा मोठा फटका बसत असल्याने या छुप्या दरवाढीविरोधात गणेश भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अनधिकृत वापर केल्यास कारवाई –

गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जाते. घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणकडून गणेश मंडळाना विजेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाविरतणकडून देण्यात आली.

चार वर्षांतील दर (५०० युनिटच्या वर वापरासाठी) –

वर्ष दर
२०१९ ४.५५ रुपये
२०२० १३.१६ रुपये
२०२१ १३.२० रुपये
२०२२ १३.२१ रुपये

Story img Loader