अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असून त्यांच्यावर सहा कोटी ३७ लाखाचे कर्ज देखील आहे. डॉ. अभय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे आलिशान वाहने, शेतजमीन व इतर मालमत्ता आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांनी बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचे विवरण दिले. त्यानुसार, त्यांच्याकडे ९ कोटी ४४ लाख ८६ हजार ३३२ रुपये, पत्नीकडे ५ कोटी ९५ लाख ४३ हजार ६६१ रुपये, हिंदू अविभक्त कुटुंबाकडे ४ कोटी ९८ लाख ८३ हजार ७२१ रुपये, मुलगा अचिंत्यकडे १ कोटी १६ लाख ४६ हजार १७८, मुलगी गार्गीकडे ६७ लाख ८७ हजार ६६९ रुपये आणि त्यांच्या आईकडे ५५ लाख ७३ हजार ७८२ रुपये अशी एकूण २२ कोटी ७९ लाख २१ हजार ३४३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. डॉ. पाटील यांच्याकडे चार आलिशान वाहने आहेत. त्यामध्ये ५७ लाख व २९ लाखाची दोन वाहने त्यांच्या नावावर, तर ३७ लाख व पाच लाखाची दोन वाहने पत्नी डॉ. रेखा पाटील यांच्या नावावर आहेत.
हेही वाचा >>> लोकजागर: अमर्याद खर्चाची ‘मर्यादा’!
कुटुंबाकडे एकूण ७५४ ग्रॅम सोने आहे. डॉ. अभय पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी ८३ लाखांचा अग्रीम कर देखील भरला. डॉ. पाटील यांच्या कुटुंबाकडे एकूण स्थावर मालमत्ता ३८ कोटी ५८ लाख ०४ हजार १११ रुपयांची आहे. यापैकी डॉ. अभय पाटील यांच्या नावावर एकूण ३० कोटी ०४ लाख २१ हजारांची मालमत्ता असून स्वसंपादित १३ कोटी ५२ लाख ७९ हजार ६९१ व वारसहक्काने १६ कोटी ५१ लाख ४१ हजार ३१२ रुपयांची प्राप्त झाली. त्यांच्या पत्नीकडे ७ कोटी १७ लाख ५५ हजार ३०८, हिंदू अविभक्त कुटुंबाकडे २३ लाख १० हजार, मुलाकडे १ कोटी ०८ लाख ५२ हजार ८०० आणि आईच्या नावावर ४ लाख ६५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची विविध ठिकाणी शेतजमीन, प्लॉट व इतर मालमत्ता आहेत. डॉ. अभय पाटील व कुटुंबावर कोट्यवधींचे कर्ज देखील आहे. डॉ. अभय पाटील यांच्यावर ६ कोटी ३७ लाख ६८ हजार ४२४, पत्नीच्या नावावर १ कोटी ६८ लाख ८७ हजार १७८, हिंदू अविभक्त कुटुंबावर ५३ लाख ४३ हजार ४२४, मुलावर ४६ लाख ४३ हजार ३०९ व मुलीच्या नाववर ३ लाख ८ हजार २६१ रुपयांचे कर्ज आहे.
प्रक्षोभक भाषण दिल्याचा गुन्हा शहर कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ. अभय पाटील यांच्यावर प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. हा फौजदारी खटला प्रलंबित आहे.