अकोला : पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले. भाजपचा भ्रष्ट कारभार असून त्याविरोधात लढणार असल्याचे आ. मिटकरी म्हणाले. होळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड वर्षापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता आ. मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. आ. अमोल मिटकरी यांनी सोमवारी दुपारी एक ट्विट केले. त्यात आ. मिटकरी म्हणाले, ‘माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरूद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार.
सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचाराने ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरूद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार.’ भाजपला चोपायची ही संधी सोडायची नाही, असे देखील त्यांनी नमूद केले. आ. मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवर नियुक्त आमदार आहेत. अमोल मिटकरी यांना आपले मूळ गाव कुटासामध्येच अनेक वेळा राजकीय हादरे बसले आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्हा परिषदेत कुटासा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रहारकडून पराभव झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीतही त्यांच्या पॅनलाचा धुवा उडाला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी कुटासा गावातील १२ सदस्यांना अपात्र घोषित केले होते. त्यापैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. दरम्यान, आ. मिटकरींना आता थेट लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.