अकोला : महावितरणच्या ‘लकी डिजिटल’ योजनेतील एका अटीमुळे मोठा गोंधळ उडाला होता. ऑनलाइन वीज देयकाचा भरणा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवड झालेल्या ग्राहकांना मोबाइल, स्मार्ट वॉच वाटपाची लकी डिजिटल ग्राहक योजना महावितरणकडून राबवली जात आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही, अशी अजब अट टाकण्यात आली होती. मात्र, महावितरणने आता आपल्या चुकीत सुधारणा करून वर्षभर ऑनलाइन भरणा न केलेले ग्राहक योजनेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले.

ऑनलाइन वीज देयक भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली. एका अटीमुळे मोठा गोंधळ झाल्याने ‘वर्षभर देयक न भरणाऱ्या ग्राहकांना महावितरण बक्षिस देणार?’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’मधून ३० मार्चला वृत्त प्रकाशित झाले. त्याची दखल घेऊन महावितरणने आपली चूक दुरुस्त केली. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेच्या पात्रतेसाठी पहिल्याच अटीमध्ये महावितरणच्या यंत्रणेने मोठा गोंधळ केला होता.

ही योजना महावितरणच्या अशा लघू दाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही, अशी अट टाकली होती. या योजनेच्या प्रसार, प्रचार साहित्यासह महावितरणच्या प्रसिद्धी पत्रकात देखील या अजब अटीचा उल्लेख केला. याचा अर्थ वर्षभरात एकदाची वीज देयक न भरणारे ग्राहक योजनेंतर्गत बक्षित मिळवण्यास पात्र ठरतील, असा समोर आला. या योजनेचा पहिला ‘लकी ड्रॉ’ काढतांना महावितरणने त्या अटीत सुधारणा केली असून त्या वर्षात ऑनलाइन वीज देयक न भरलेले ग्राहक योजनेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नियमित ऑनलाइन भरणारे ग्राहक बेदखलच

१ जानेवारी ते ३१ मेदरम्यान वीज देयकांचा ऑनलाइन भरणा करणारे ग्राहक योजनेसाठी पात्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वीज देयकांचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येत नसून ते बेदखलच आहेत. त्यामुळे त्या ग्राहकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.