अकोला : शहरातील रेल्वेस्थानक मार्गावरील भागवतवाडीमध्ये एका झाडाच्या प्रत्येक फांदीवर पांढऱ्या फुलांचा बहर आला आहे. लांबून पाहिल्यावर ही फुले नसून झाडाची कोवळी पाने असल्याचा भास होतो. मात्र, झाडाखाली पडलेल्या पाकळ्यांचा सडा आणि परिसरात पसरलेला मंद सुगंध या फुलाची ओळख पटवून देतो. मन प्रसन्न करणारा हा वृक्ष म्हणजे अत्यंत दुर्मीळ प्रजातीमधील ‘वायवर्ण’ अर्थात ‘वरुण’ आहे. हे वृक्ष पर्यावरण प्रेमींसह अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात जुने दुर्मीळ वृक्ष अत्यंत अल्पसंख्येत आहेत. यामध्ये बहावा ऊर्फ अमलतास, शाल्मली, गिरीपुष्प, ‘बॉटलब्रश’, ‘स्पॅ-थोडिया’, महारुख, अशोक, काशीद, पिवळा टॅबेबुया, बकाणा निंब, पांढरा चाफा, चिंच, विलायती चिंच, कवठ, शंकासुर, गुलमोहोर आदी शोभा वाढवत आहेत. सध्या शहरातील रेल्वेस्थानक मार्गावरील भागवत वाडीमध्ये दुर्मीळ वायवर्ण ऊर्फ वरुण वृक्ष अक्षरश: फुलांनी बहरला आहे. दोन वृक्ष अंगावर पिवळ्या-पांढऱ्या रंगाची फुले पांघरून बसली आहेत. संपूर्ण पर्णहीन होऊन हे वृक्ष आजूबाजूच्या परिसरात एखाद्या लावण्यवतीसारखी ऐटीत उभे आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात हा वृक्ष बहरतो. वरुणाची पाने हिवाळ्यात गळून जातात. वसंताच्या आगमनाबरोबर मार्च-एप्रिलमध्ये हे वृक्ष बहरू लागतात. वायवर्णाची फुले म्हणजे देठाजवळच्या पानांसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या पाकळ्या व त्यामधून निघालेल्या जांभळ्या पुंकेसरांचा झुबकाच असतो. अत्यंत आकर्षक व नाजूक फुलांनी बहरलेला वरुणाचा वृक्ष वसंत ऋतूत खूपच आकर्षक दिसतो.

हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?

फुलांच्या पाकळ्या पिवळ्या होतात व बहर संपताना नवीन पालवी येते. सुरुवातीला हिरवी दिसणारी वरुणाची लंबगोलाकार फळे पिकल्यावर लाल होतात. त्याला संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा सध्याच्या व्यापारीकरणाच्या युगात हे वृक्ष कधी गायब केले जातील हे कळणारही नाही, अशी भीती ज्येष्ठ पक्षीमित्र व माजी मानद वन्यजीव रक्षक दीपक जोशी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – “संजय राऊत खोटे बोलताहेत,” प्रकाश आंबेडकर यांचे विधान; म्हणाले, “आधी भांडणे मिटवावीत…”

वृक्षाचे औषधी गुणधर्म

‘वरुणादि क्वाथ’ हे मूत्रमार्गाच्या विकारांवर, विशेषत: मुतखड्यावर गुणकारी म्हणून वापरले जाणारे आयुर्वेदिक औषध वरुणाच्याच मूळ व सालींपासून तयार केले जाते. ‘क्रॅटिव्हस’ नामक ग्रीक वनस्पती तज्ज्ञाच्या नावावरून याचे शास्त्रीय नाव ‘क्रॅटिव्हा तर ‘रिलिजिओसा’ म्हणजे धार्मिक महत्त्व असलेला असेही संबोधले जाते, अशी माहिती दीपक जोशी यांनी दिली. अकोलेकरांनी वरुण वृक्षाच्या सान्निध्यात काही क्षण घालवून निसर्गाचा आनंद अनुभवयालाच हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola mind pleasing tree an eye catching bloom of the rare vivarna tree ppd 88 ssb