अकोला : चारित्र्यावर संशय घेत असल्याने जावयाने सासूची हत्या करून अपघाताचा बनाव रचल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला. या प्रकरणी अकोट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम धारुळ येथील कमलाबाई गंगाराम बेठेकर (६०) या इंधन आणण्यासाठी ३ मे रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या. कमलाबाई घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. तोल गेल्याने कमलाबाईचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने जखम केल्याचे समोर आले.
हेही वाचा – पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष! मेळघाटातील हे गाव आहे २८ वर्षांपासून टँकरग्रस्त; महिलांना…
हेही वाचा – वडेट्टीवार यांच्या पोस्टरला चपलांचा हार; यवतमाळात शिवसेनेचे निषेध आंदोलन
मृत महिलेच्या जावयावर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. अर्जुन शंकर कासदेकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन याची पत्नी त्याला सोडून गेल्यापासून तो त्याच्याच सासरवाडीत राहत होता. जावयाची मुलाच्या पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय सासूला होता. त्यातून दोघांचे वाद झाले. जावयाने राग मनात धरून सासूला एकटे गाठत तिची हत्या केली. अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.