अकोला : वाढत्या तापमानासोबतच आता अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. अकोला महापालिकेकडून आज, १६ एप्रिलपासून पाणी कपात केली जाणार असून आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल. शहरातील नागरिकांना पाण्याचा वापर सांभाळून करावा लागणार आहे.
अकोला महानगरपालिकेकडे पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) आहे. १५ एप्रिल रोजी या प्रकल्पामध्ये २२.८३ द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरामध्ये उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी देखील वाढत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत असल्याने महापालिकेपुढे नियमित पाणी पुरवठा करण्याचे आव्हान निर्माण झाले. सध्या तीन दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा १६ एप्रिलपासून चार दिवसआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.
६५ एमएलडीवरील महाजनी, मोठी उमरी, गुडधी, नेहरु पार्क, तोष्णीवाल, आदर्श कॉलनी, केशव नगर, रेल्वे स्थानक, गंगा नगर, अकोट फैल, जोगळेकर प्लॉट व लोकमान्य नगर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी करण्यात येईल. अकोला शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन अकोला महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
उन्हाच्या तीव्रतेसोबतच जलसाठ्यात सातत्याने घसरण
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात देखील अकोल्यात उन्हाचा पारा प्रचंड चढला. अकोला जिल्ह्यातील तापमान दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर पडणे कठीण झाले. अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा लागत आहेत. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होतात. वाढत्या तापमानासोबतच आता अकोल्यातील नागरिकांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले. एकीकडे तापमान प्रचंड वाढत असतांनाच दुसरीकडे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता अकोलेकरांना पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागेल. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान प्रकल्पातील पाणी साठ्यातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. जल साठ्यात सातत्याने होत असलेली घसरण चिंतनाचा विषय ठरत असून महापालिकेने पाणी कपात जाहीर केली. पाच दिवसांनी शहरात पाणी पुरवठा होईल. त्यामुळे अकोलेकरांना आता तप्त उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागेल.