लोकसत्ता टीम

अकोला : अकोला महापालिकेचे २०२५-२६ वर्षाच्या १४५६.८३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांनी मंगळवारी सभेत मंजुरी दिली. प्रशासकांच्या कार्यकाळातील अकोला महापालिकेचे हे सलग तिसरे अंदाजपत्रक आहे. २०२५-२६ वर्षासाठी महापालिकेचे सुमारे एकूण उत्पन्न १४५६.८३ कोटी असून अंदाजित खर्च १४४५.९१ कोटी रुपयांचा आहे. ई-बस सेवेसाठी स्थानक, दिव्यांग भवनासह विविध तरतुदी अंदाजपत्रकात केल्या आहेत.

अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या अध्यक्षतेखाली सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मुळ अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी अर्थसंकल्‍पीय सभा घेण्यात आली. यावेळी मुख्‍य लेखा अधिकारी जगदिश मानमोठे, मुख्‍य लेखा परिक्षक वैजनाथ शेळके, मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे, शहर अभियंता नीला वंजारी, कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, सहा.आयुक्‍त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.शाहीन सुल्‍ताना यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. आयुक्तांनी महानगरपालिका प्रशासनाचे प्राप्‍त होणारे उत्‍पन्‍न तसेच प्रशासकीय खर्च, आसवश्‍यक सोई-सुविधा पुरविण्‍यासाठी अपेक्षित कामानिहाय खर्च याचा समातोल राखीत १०.९२ कोटी शिल्‍लकीचे अंदाजपत्रक सादर केले. त्याला मंजुरी देण्यात आली.

२०२५-२६ च्या अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न ३३५.२६ कोटी, भांडवली अनुदान व मनपा मालकीच्या जागेचे उत्पन्न ८६३.३० कोटी असाधारण ऋण व निलंबन लेखे १८१.९५ कोटी असे एकूण १४५६.८३ कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न आहे. एकूण महसूली खर्च ३२२.६९ कोटी, महापालिका निधीतून विकास कामे व शासन अनुदानातून असा एकूण भांडवली खर्च ९३५.८० कोटी असाधारण ऋण व निलंबन लेखे १८७.४२ कोटी एकूण अपेक्षित खर्च १४४५.९१ कोटी रुपये राहणार आहे. या अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ केलेली नाही.

महापालिकेला केंद्र शासनाकडून ४२ वातानुकूलित ई-बस प्राप्त होणार आहे. त्यासाठी खडकी दक्षित झोनमध्ये बसस्थानक उभारण्यात येणार असून यासाठी १० कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली. या बसला चार्ज करण्यासाठी ‘चार्जींग स्टेशन’ तयार केले जाणार असून त्यासाठी २.५० कोटी, तर मनुष्यबळ पुरवण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बस सेवा परिचलनामधील तूट भरून काढण्यासाठी सात कोटींची तरतूद केली आहे.

अंदाजपत्रकामध्ये प्राप्त कर, शुल्क, अनुदान व अन्य जमा लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील विकास कामे व नागरिकांसाठीच्या अत्यावश्यक सेवा व सुविधांवर होणाऱ्या खर्चाला प्राधान्य देण्यात आले. मालमत्तासह इतर माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर आहे. अंदाजपत्रकात योग्य ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. सभेचे सूत्रसंचालन अनिल बिडवे यांनी केले.