अकोला : दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, अमरावती येथे  नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालून सतत ‘लव्ह जिहाद’ चा उल्लेख केला. खरे तर हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. तरीही दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेल्याचा त्यांचा आरोप होता. समाजमाध्यमातून हे वृत्त सर्वत्र प्रसरले. नवनीत राणा यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शांतता भंग करणारी  कृत्ये केल्याचे या तक्रारीत नमूद  आहे. खासदार राणा यांचे हे कृत्य स्पष्टपणे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून  त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी जावेद झकेरिया यांनी या तक्रारीत केली आहे.