Amol Mitkari : अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसैनिकांनी मंगळवारी दुपारी शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हल्ला केला. अमोल मिटकरी यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. आमदार मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल न केल्याने संतप्त सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस मनसैनिकांना वाचवत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला. आपलं सरकार व गृहमंत्री असतांना देखील सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे सुपारीबहाद्दर असल्याची टीका त्यांनी केली होती. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाही. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यावेळी आमदार अमोल मिटकरी एका बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. त्यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला. राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला. घटनेनंतर मनसैनिक घटनास्थळावरून फरार झाले.

हेही वाचा…भाजपा नेते आशीष देशमुख यांचा महायुतीला घरचा आहेर, म्हणाले “केदार यांना वळसे पाटील पाठीशी घालत आहे.”

अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसैनिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशा हल्लांना आम्ही भीक घालत नाही. ते नपूसंक आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. मागून हल्ले करुन काही होणार नाही. ही गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…नागपूर : ‘ॲट्रोसिटी’ची ८० टक्के प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित… आता सर्व सरकारी वकिलांना…..

दरम्यान, या घटनेची तक्रार देण्यासाठी आमदार अमोल मिटकरी शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांना पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नसल्याने आमदार मिटकरी यांनी तीव्र रोष व्यक्त केला. फिर्याद दाखल केली नाही. आरोपी मनसैनिक स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना भेटून फरार झाल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola ncp mla amol mitkari s vehicle attacked by manse karykartas mitkari protests at police station over lack of action ppd 88 psg