अकोला : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ५६ वर्षांपूर्वी नऊ जणांनी बलिदान दिले होते. विद्यापीठ उभारण्यासाठी सुरू केलेल्या तीव्र आंदोलनावर अमरावती येथे गोळीबार झाला. त्यामध्ये २० ऑगस्ट १९६८ रोजी नऊ जण शहीद झाले. कृषी विद्यापीठासाठी त्या शहिदांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन कृषी विद्यापीठाची पायाभराणी केली. आता ‘डॉ.पं.दे.कृ.वि.’ तून हजारो हजारो पदवीधर घडले असून लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी मार्गदर्शनाचे कार्य केले जाते. विदर्भाच्या कृषी क्षेत्रात विद्यापीठामुळे परिवर्तन घडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी जुनीच. विदर्भातील शेतीच्या प्रश्नांवर संशोधन होऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने विद्यापीठ स्थापन होण्याच्या मागणीने जोर धरला होता. विद्यार्थ्यांना कृषीचे धडे मिळण्यासोबतच विस्तार कार्याला देखील बळ मिळेल, या आशेवर विद्यापीठासाठी लढा उभारण्यात आला. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच करण्यासाठी १९६८ साली प्रचंड मोठे आंदोलन उभारण्यात आले. हे आंदोलन चांगलेच पेटले होते. २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केल्यावर आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद हे नऊ जण शहीद झाले. हिंसक स्वरूप प्राप्त झालेल्या आंदोलनात अनेक जण जखमी झाले. कालांतराने राज्यातील चारपैकी एक कृषी विद्यापीठ विदर्भातील अकोला येथे स्थापन करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..

शहिदांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. शहिदांच्या स्मृती कायम राहण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्यालयात शहीद स्मारकाची उभारणी केली. विदर्भातील ११ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले ‘डॉ.पं.दे.कृ.वि.’ गेल्या ५५ वर्षांपासून संशोधन, कृषी शिक्षण, विस्तार व बीजोत्पादनाचे कार्य करीत आहे. कृषी विद्यापीठावर पांढरा हत्ती असल्याची टीका नेहमीच होत असली तरी त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना होत आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…

शहिदांना आदरांजली

विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे शहिदांना विशेष कार्यक्रमात आज आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख, तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे, डॉ. राजेंद्र काटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola nine people sacrificed their lives for the establishment of panjabrao deshmukh agricultural university 56 years ago ppd 88 ssb