अकोला : ग्रामपंचायतच्या कामातील दिरंगाईमुळे पती-पत्नीत दुरावा निर्माण होऊन पतीला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतद्वारे करण्यात येणारे नालीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे टॉयलेट अर्थात शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले. या मूलभूत समस्येला कंटाळून पत्नीने थेट माहेरची वाट निवडली. या प्रकरणात त्रस्त पतीने वारंवार तोंडी सूचना देऊनही ग्रामपंचायतीने तक्रार दूर न झाल्याने अखेर गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. दिग्रस येथील विकास तायडे यांनी लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके कारण काय?

पातूर तालुक्यातील दिग्रस बु. गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये नालीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. हे काम करताना आजूबाजूच्या घरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नालीतील सांडपाणी घरासमोर साचत आहे. घराशेजारील नालीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाही. या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तसेच शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबास उघड्यावर शौचास जावे लागते. कुटुंबीयांची प्रचंड कुचंबणा होत आहे. या समस्येमुळे पत्नी देखील माहेरी निघून गेली. कुटुंबाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशी उद्विग्न भावना तक्रारदाराने अर्जात नमूद केली आहे.

पतीने दिला उपोषणाचा इशारा

गेल्या चार महिन्यांपासून ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना तोंडी तक्रार दिली. मात्र, त्याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. नालीचे बांधकाम न झाल्यास उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा तक्रारदार विकास तायडे यांनी दिला आहे. या प्रकरणात नालीच्या बांधकामासंदर्भात संबंधित कंत्रादाराला सूचना देण्यात आल्या असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे दिग्रस बु.च्या सरपंच आशा कराळे यांनी सांगितले.

मानहानीकारक प्रकार

महिलांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागात ‘जहाँ सोच वहाँ शौचालय’ या जाहिरातीद्वारे व्यापक मोहीम राबवत असले, तरी ग्रामपंचायतच्या नालीच्या कामातील दिरंगाईमुळे एका कुटुंबाला शौचालय वापरणे अशक्य झाले. हा प्रकार मानहानीकारक असल्यामुळे शेवटी पत्नीने कुटुंबाला सोडून माहेरी जाणे पसंत केले. ग्रामपंचायतच्या कामामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.