अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते. नाना पटोले यांची लाडूतूला होती. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या लाडूतूला कार्यक्रमाचे आयोजनादरम्यान निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. नियोजित कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

हेही वाचा – चंद्रपूर : धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने केली मारहाण

वाडेगाव येथे पाऊस पडला होता. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. पालखीच्या ठिकाणी सर्वत्र चिखल झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. या चिखलातून पायवाट काढत संत श्री गजानन महाराजांचे भाविक भक्त देखील मोठ्या संख्येने दर्शन घेत होते.

मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – नितीन राऊत यांचा मुख्यमंत्री शिदेंवर पलटवार, म्हणाले ” सरकार दलितांच्या आंदोलनाला..”

विरोधकांच्या हातात आयते कोलीत?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने आपल्या हाताने पाण्याने धुतल्याची कृती केली. या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाल्याचे देखील बोलल्या जात आहे. या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चेला पेव फुटले. या कृतीमुळे नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.