अकोला : छत्रपती संभाजीनगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्याची थरारक घटना अकोल्यात घडली. नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनावर आरोपीची मोटार धडकली. इतर एका दुचाकीला देखील आरोपीच्या वाहनाने धडक दिली. या प्रकरणात अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी आरोपीला अटक करून अपहृत मुलीची सुटका केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मुलीचे अपहरण, भरधाव वाहनाने पसार होण्याचा आरोपीचा प्रयत्न, पाठलाग करणारे पोलीस, मार्गात येणाऱ्या वाहनांना आरोपीच्या वाहनांची धडक, मग आरोपीला अटक असे दृश्य नेहमीच चित्रित केले जाते. आपण ते चित्रपटांमध्ये बघत असतो. अकोल्यात मात्र हे थरारक चित्र प्रत्यक्षात महामार्गावर दिसून आले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अपहृत मुलीचा जीव वाचवला. बुलढाणा जिल्ह्यातील आरोपी अमित बेडवाल (२२) याने छत्रपती संभाजीनगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तत्काळ सखोल तपास सुरू करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि अकोला पोलिसांची सतर्कता
अपहृत मुलीला घेऊन आरोपी चारचाकी वाहनाने अकोला जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना मिळाली. तत्काळ याची माहिती बुलढाणा पोलिसांना देऊन आरोपीचा पाठलाग सुरू करण्यात आला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे आरोपीला कळताच त्याने वेगाने वाहन पळवले. आरोपी अपहृत मुलीला घेऊन अकोला मार्गे पळण्याचा प्रयत्न करीत होता. याची माहिती अकोला पोलिसांना देण्यात आली. शहरातील डाबकी रोड पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपीचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे आरोपी आणखी गोंधळला. पोलिसांचा पाठलाग अन् पळून जाण्याच्या नादात आरोपीचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव आरोपीच्या वाहनाने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. एका दुचाकीलाही आरोपीच्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विविध आरोपाखाली गुन्हा
छत्रपती संभाजीनगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सरकारी कामात अडथळा प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीला अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.