अकोला : गत १० वर्षांत अपहृत व हरवलेल्या जिल्ह्यातील ४९८ जणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १३’ ही विशेष मोहीम राबवून त्यांचा महिनाभरात शोध घेतला. बालक, युवती, महिला यांना कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत हरवलेली महिला, पुरुष, अपहृत बालक, बेवारस बालक, भीक मागणारी मुले यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची विशेष मोहीम ‘ऑपरेशन मुस्कान-१३’ १ ते ३१ डिसेंबरपर्यंत अकोला पोलिसांकडून राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.हे.कॉ अनिता टेकाम, पो.कॉ. उज्ज्वला इंगळे यांनी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील हरवलेल्या महिला, पुरुष, बालक यांची माहिती मागवून घेतली. त्यांची शोध मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामधून प्रत्येकी एक महिला व पुरुष अंमलदारांना स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्यावर घेतले. एकूण ३२ महिला व पुरुष अंमलदारांचे शोध पथक गठीत करून ‘ऑपरेशन मुस्कान १३’ मोहीम राबविण्यात आली. पथकातील प्रत्येक पोलीस अंमलदारांना मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच आरएसएसच्या शाखेला भेट दिली होती का?

हरवलेल्या महिला, पुरुष यांचा शोध घेण्यासह बेवारस, कचरा वेचणारे, रस्त्यावर भीक मागणारे बालक, अपहृत यांचा कसून शोध घेण्यात आला. अपहृत बालकांचा शोध घेवून त्यांना कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. अपहरण गुन्ह्यात मुलींचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचे पो.कॉ. आशीष आमले यांची तांत्रिक मदत मिळाली. अनैतिक मानवी वाहतूक कक्षातील अंमलदारांनी अपहरण गुन्ह्यात शोध घेण्यास मोठे सहकार्य केले. पातूर येथील पो.कॉ. श्रीकांत पातोंड यांनी हरवलेल्या मतिमंद बालकाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्याला ताब्यात दिले. अनेक वर्षांपासून कुटुंबापासून दुरावलेले शेकडो सदस्य पुन्हा परिवारात परतल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. या प्रकारचे अभियान नियमित राबविण्याची गरज आहे.

हेही वाचा – चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…

अपहृत १६ मुले-मुली कुटुंबाकडे परतले

विशेष मोहिमेमध्ये अपहृत १६ मुले-मुली, हरवलेल्या महिला २२५, पुरुष १२५, बेवारस बालक १३२ असे एकूण ४९८ जणांचा शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.