अकोला : शहरात हिंसाचाराची घटना घडल्यानंतर आता अकोला पोलिसांनी समाजमाध्यमांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘व्हॉट्सॲप’ समूह ॲडमिनला विविध पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांनी नोटीस बजावल्या आहेत.
समाजमाध्यमातील एका आक्षेपार्ह संदेशामुळे शहरातील शांततेला बाधा पोहोचली. १३ मे रोजी मोठा वाद निर्माण होऊन जुने शहरात समाजकंटकांनी दगडफेक, जाळपोळ करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करून दोन दिवस इंटरनेट सेवा बंद केली होती. समाजमाध्यमावर विशेषत: ‘व्हॉट्सॲप’वर आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांचे आदान-प्रदान करण्यात येऊ नये, या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासन सतर्क झाला आहे.
हेही वाचा – संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर येताच उडाली खळबळ, कारण काय?
‘व्हॉट्सॲप’ समुहाबाबत पोलिसांनी माहिती गोळा केली. त्यामध्ये समूह ॲडमिनला नोटीस बजावून आक्षेपार्ह संदेश, चित्रफित प्रसारित होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘व्हॉट्सॲप’ समुहावर कोणत्याही धर्म, जातीच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल, असे संदेश, चित्रफित प्रसारित करणार नाही आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, या दृष्टीने ॲडमिन व समूह सदस्यांनी खबरदारी घ्यावी, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. समुहामधील कोणत्याही सदस्यांकडून आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संदेशाचे आदान-प्रदान झाल्यास संबंधित समूह ॲडमिनवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.