अकोला : ‘आम्ही चित्रपटात काम करणारे अभिनेते आहोत. समाजासाठी झोकून देऊन कार्य करणारे वर्दीमधील खरे हिरो आहेत,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यांनी आज येथे केले.पोलीस कुटुंबातील महिला सदस्य, महिला अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य जनजागृतीसाठी अकोला पोलीस विभागाद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी ‘वॉकथॉन २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सौरभ गाडगीळ, मनपा आयुक्त सुनील लहाने, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी कुटुंबीयांसह उपस्थित होते.

अभिनेते स्वप्नील जोशी यांनी पोलीस कुटुंबीयासोबत संवाद साधला. मला अत्यंत आनंद होत आहे. जगातील खरे हिरो हे वर्दीतील असतात, असे मत व्यक्त करून त्यांनी पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार यांना आरोग्याविषयक काळजी घेण्याचा सल्ला दिला. चांगले आरोग्य हे काळाची गरज आहे. शारीरिक तंदुरूस्ती आपल्याला मजबुत, सक्रिय आणि कोणत्याही आव्हानांना सामना करण्यास सज्ज ठेवते, असे बच्चन सिंह म्हणाले.

प्रमुख अतिथींनी हिरवी झेंडी दाखवून ‘वॉकथॉन’ स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. महिलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला. ‘चालत रहा, बोलत रहा’ या ‘वॉकथॉन’च्या घोषवाक्यानुसार महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच संकल्प ढोल पथकाने देखील सहभाग घेऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. शहरातील प्रमुख मार्गावरून ‘वॉकथॉन’ ने मार्गक्रमण केल्यानंतर स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

‘वॉकथॉन’ स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल स्पर्धकांना विविध पदके देऊन सन्मानित केले. आर. जे. श्रीने कार्यक्रमाचे सूत्रसंचलान केले, तर गौरी कुलकर्णी यांनी आभार मानले. अकोला पोलीस दल तसेच कुटुंबातील दोन हजार ३०० महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

नियोजन महिलांच्या हाती

अकोला पोलीस दलाद्वारे आयोजित ‘वॉकेथॉन’ स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी महिलांच्याच हाती होती. सिरीशा सिंह, पोलीस निरीक्षक वैशाली मुळे, उज्ज्वला देवकर यांच्या सहकार्याने अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व महिला अंमलदार व पोलीस कुटुंबीयातील महिलांना स्पर्धेत सहभागी होण्याचे नियोजन केले.

Story img Loader