अकोला : शहरातील न्यू तापडिया नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटक रेल्वे मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आठ दिवस बंद ठेवण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मोठा फेरा घेऊन नागरिकांना शहर गाठावे लागते. मध्य रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील फाटक क्र. ३८ ए हे १ जानेवारीला सकाळी ६ वाजतापासून रेल्वे मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बंद केले. हे फाटक ८ जानेवारीला रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. मध्य रेल्वेने तब्बल आठ दिवस रेल्वे फाटक बंद ठेऊन परिसरातील नागरिकांना चांगलेच वेठीस धरले आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेकडून मार्गाची देखभाल व दुरुस्तीचे कार्य रात्रीच्या सुमारास वाहतूक बंद ठेऊन केले जात होते. या वेळेस प्रथमच संपूर्ण आठ दिवस २४ तास वाहतूक बंद केली. याठिकाणी दिवसा रेल्वे मार्गाचे काम सुरू ठेऊन रात्री ते बंद ठेवण्यात येते. वास्तविक रात्री काम करून दिवसा फाटक वाहतुकीसाठी सुरू ठेवता आले असते. मात्र, मध्य रेल्वेने नागरिकांच्या गैरसोयीचा विचार न करता थेट आठ दिवसांसाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्याचा मनमानी निर्णय घेतला.
हेही वाचा – मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांना मराठी येते काय? शासनाकडून उत्तर देण्यात टाळाटाळ
u
जठारपेठमधून न्यू तापडिया नगरकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, खरप बु. आदी परिसरासह विविध गावांना अकोला शहराशी जोडणारा हा मार्ग असून रेल्वे फाटक बंद असल्यामुळे या भागातील नागरिकांची अत्यंत अडचण होत आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी फाटक बंद करण्यापूर्वी रेल्वेने वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे न्यू तापडिया नगर भागातील नागरिकांना पंचशील नगर, आपातापा मार्ग, अकोट फैल मार्गे शहर गाठावे लागते. हा खडतर मार्ग अनेक कि.मी. दुरवरून जात असल्याने नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रासासह आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते. शाळकरी विद्यार्थ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठी रुग्णाची वाहतूक करण्याची वेळ आल्यास रेल्वे फाटक बंद राहण्याचा प्रकार जीवावर उठण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
हेही वाचा – चंद्रपूर : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांनाच होणार दंड
रेल्वेकडून वेगवेगळे नियम?
दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरील फाटक क्र. ८७ जवळ रेल्वे मार्ग व रस्ता तयार करण्यासाठी अकोला ते मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक ३ ते ५ जानेवारीदरम्यान रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. मात्र, मध्य रेल्वेच्या फाटक क्र. ३८ एची वाहतूक आठ दिवस २४ तासांसाठी बंद केली. रेल्वेकडून दोन फाटकांमध्ये फरक करून काम करण्यासाठी वेगवेगळे नियम लावले जातात का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.