अकोला : मध्य रेल्वेकडून तांत्रिक कार्य करण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यासाठी ब्लॉक घेतला असून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्याच अडचणीचा सामना करावा लागेल.
भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरण अप लूप लाईन ७१४ मीटरवरून ७५६ मीटरपर्यंत विस्तार तसेच गती वाढीकरण यासाठी यार्ड पुनर्रचना कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य तसेच ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्याचा काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. २३ ते २६ मार्चदरम्यान काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहतील.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाडी क्रमांक ११११३ देवळाली ते भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ११११४ भुसावळ ते देवळाली मेमू, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक ते बडनेरा मेमू व गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा ते नाशिक मेमू या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे होणारा गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी गुणवत्तापूर्ण पाणी – मध्ये रेल्वेचा दावा
भारतीय रेल्वेने प्रवाशांना उच्च प्रतीच्या आणि सुरक्षित बाटली बंद पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, ही भारतीय रेल्वेची प्राधान्यपूर्ण जबाबदारी राहिली. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे ‘रेल नीर’ ब्रँडचे उत्पादन केले. रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेल नीर’ हे अधिकृत बाटली बंद पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांना गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे हा आहे. ‘रेल नीर’ पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येते. आयआरसीटीसीद्वारे ठरवलेल्या कठोर निकषांनुसार प्रत्येक बाटलीची निर्मिती केली जाते. प्रवाशांना शुद्ध, सुरक्षित आणि ताजे पाणी मिळू शकेल. प्रवाशांकडून ‘रेल नीर’ च्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली, तर त्वरित त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी केली जाते, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.