अकोला : दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पहिला पेपर सोडवताना चक्क रील बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. समाज माध्यमावर ती चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. परीक्षा केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना नियमबाह्यरित्या परीक्षा केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले. या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करतात. परीक्षेत गैरमार्गाचा वापर होऊ नये म्हणून प्रशासनाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येते. अकोल्यातील एका प्रकारामुळे दहावीच्या परीक्षेतील व्यवस्था व सुरक्षेतील भोंगळपणा चव्हाट्यावर आला. शहरातील अग्रेसन चौकामध्ये सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आहे. या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी एका युवकाने चक्क रील बनवली. केंद्राच्या फाटकापासून संपूर्ण केंद्राचे चित्रीकरण करण्यात आले. धक्कादायक म्हणजे परीक्षार्थी उत्तरपत्रिका लिहित असल्याचे देखील त्याने चित्रित केले. त्याची चित्रफित चक्क ‘इंन्स्टाग्राम’वर शेयर केली आहे. ती रील समाजमाध्यमात चांगलीच प्रसारित झाली. परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बोथ चालू ठेवण्यास निर्बंध आहेत. त्यासोबत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल आदी वस्तू घेऊन जाण्यावर बंदी आहे. तरीही देखील विद्यार्थ्याने मोबाईल परीक्षा केंद्रात नेऊन परीक्षा खोलीसह संपूर्ण केंद्राचे चित्रीकरण केले. यावरून परीक्षा केंद्रावर तैनात सुरक्षा व्यवस्था किती ‘सतर्क’ आहेत, याचा प्रत्यय येतोच. या प्रकाराची चौकशी होऊन दोषी तरुणावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अकोला : दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पहिला पेपर सोडवताना चक्क रील बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. समाज माध्यमावर ती चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. pic.twitter.com/DSoseYibwn
— LoksattaLive (@LoksattaLive) February 23, 2025
शिक्षणाधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर केंद्र
सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर रील बनवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या शाळेपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व रामदास पेठ पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. तरुण परीक्षा केंद्रावर चित्रीकरण करतांना केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी नेमके करत काय होते? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.