अकोला : राज्यात वाळू माफियांची दादागिरी चांगलीच वाढत आहे. महसूल व पोलीस विभागाच्या कारवाईला विरोध करून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील नायब तहसीलदारांना अश्लील शिवीगाळ करून वाहनासह पेटवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना भ्रमणध्वनीवर अश्लील, जातीवाचक शिवीगाळ करत शासकीय वाहन पेटवून देण्याची धमकी देणे व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रहारचे माजी पदाधिकारी अरविंद पाटील, सचिन निमकाळे व आणखी तिघांविरुद्ध पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत वाढल्याचे चित्र आहे.
राज्यात आजही मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन व साठवणूक होत आहे. अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार असून सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीरपणे डल्ला मारण्याचे प्रकार होत आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष देण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष मोहीम राबवून कारवाई सुरू केली.
अवैध वाळू माफियांकडून कारवाईला विरोध करण्यासोबतच अधिकाऱ्यांना धमकवण्याचे प्रकार समोर आले आहेत. पातूर येथे तर चक्क नायब तहसीलदारांना अश्लील व जातीयवाचक शिवीगाळ करून शासकीय वाहनासह पेटवून देण्याची धमकी वाळू माफियांनी दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अरविंद पाटील यांच्या ओळखीतील एका व्यक्तीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. यानंतर अरविंद पाटील यांनी नायब तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वाद घातला. त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या संभाषणाची ध्वनिफित समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारीत झाली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांनी पोलिसात धाव घेतली.
तक्रार दाखल झाल्यावर पातूर पोलिसांनी पडताळणी करून अरविंद पाटील (रा. टाकळी खोजबळ, ता. बाळापूर), सचिन निमकाळे (रा. आसोला, ता. पातूर) व त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम करीत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.