अकोला : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत शहरातील शिवणी विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवणीवरून सात मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे खासदार अनुप धोत्रे यांनी सादर केला. त्या प्रस्तावावर विमान कंपन्यांकडून देखील चाचपणी केली जात आहे. मोदी सरकार तीनमध्ये उडान योजनेंतर्गत विमान कंपन्यांसोबत नव्याने करार झाल्यावर शिवणीवरून १९ आसनी विमानाची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रादेशिक मार्गांवर परवडणारा हवाई प्रवास प्रदान करण्यासह विमानसेवेचा विस्तार आणि संपर्क क्षेत्र वाढवणे हे उडान योजनेचे उद्देश आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार विमान कंपन्यांना सहभागी होण्यासाठी सवलती आणि आर्थिक सवलती देते. सरकारकडून अनुदान देखील दिले जाते. आता उडानअंतर्गत नव्याने करार केले जाणार आहेत. त्यामध्ये अकोल्यातील शिवणी विमानतळाचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न भूसंपादनाअभावी रखडला आहे. त्यामुळे शिवणी विमानतळाच्या सध्या अस्तित्वातील १४०० मीटर धावपट्टीवरूनच १९ आसनी विमानसेवा सुरू करण्याची भूमिका खासदार अनुप धोत्रे यांनी घेतली. शिवणीवरून हवाईसेवेला प्रारंभ होण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी खासदार धोत्रे यांनी सविस्तर चर्चा केली. हवाईसेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बोलणी झाली असून त्यांनी शिवणीवरून सेवा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उडान योजनेंतर्गत नव्याने करार होणार असून त्यात शिवणीचा समावेश करण्यासाठी प्रथम टप्पा राहील. त्यानंतर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या शिवणीवरून सुरू होणाऱ्या संभाव्य मार्गाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain Alert Today : ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

पहिल्या टप्प्यात अकोल्यावरून पुणे, मुंबई, हैदराबाद, इंदोर, तिरुपती, सुरत आणि अहमदाबाद मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. अकोल्यासह पश्चिम विदर्भाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासाठी मोठ्या शहरांना हवाईसेवेने जोडण्याची आवश्यकता आहे. कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराजांचे धार्मिकस्थळ अकोल्यापासून जवळच आहे. लोणार व इतर पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी असते. भाविक व पर्यटकांसाठी विमानसेवा सोयीस्कर होण्यासह त्याला व्यापक प्रतिसाद देखील लाभेल. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधकांचे येणे-जाणे सातत्याने असते. जलद आरोग्य सेवा व रोजगार निर्मिती होण्यासाठी देखील विमानसेवा उपयुक्त ठरेल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे.

हेही वाचा – नागपूर : अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’

अकोल्यातील शिवणी विमानतळावरून उडान योजनेंतर्गत सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. सात मार्गांवर हवाईसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे दिला. नव्या करारानंतर शिवणीवरून हवाईसेवा सुरू होऊ शकते. – अनुप धोत्रे, खासदार, अकोला.