अकोला : अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न विधान परिषदेत एका स्थानिक आमदाराने उपस्थित केला होता. भाजपच्या सत्तेतील अकोला महानगर पालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामार्फत संबंधितांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मी त्याला साफ शब्दात नकार दिला, असा खळबजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आज येथे केला. अकोल्यात नितीन देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असं वक्तव्य मराठी साहित्य संमेलनात केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे अडचणीत सापडल्या आहेत.

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. नितीन देशमुख म्हणाले, “डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे एखादी भ्रष्टाचाराची लक्षवेधी लागली तर त्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी होते. त्याचे एक उदाहरण माझ्यासमोरचे आहे.

माझ्याकडे त्यांनी एक प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळेस अकोला महानगर पालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला होता. अकोल्यातील तत्कालीन विधान परिषदेच्या आमदारांनी विधान परिषदेमध्ये अकोला महानगर पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठकी सुद्धा बोलावल्या होत्या. त्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः मला म्हटले होते की, आपण विरोधी पक्षातील लोकांना सहकार्य करू. त्या विधान परिषदेच्या आमदारांनी जो भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न मांडला, तो दडपण्यासाठी २५ लाखांची मागणी तुम्ही संबंधितांकडे करा. मात्र, मी त्यांना नकार दिला. असे कृत्य मी करू शकत नसल्याचे त्यांना सांगितले. विधान परिषदेतील एलएक्यू संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः २५ लाख रुपयांची मागणी केली होती.”

मला संबंधित माजी आमदारांचे नाव घ्यायचे नाही. त्या माजी आमदारांनी अकोला महानगर पालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नीलम गोरे यांनी दोन वेळा बैठकी सुद्धा घेतल्या. मात्र, नंतर माझ्यामार्फत २५ लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोपांचा पुनरुच्चार आमदार नितीन देशमुख यांनी केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.

Story img Loader