अकोला : तप्त, जळत असलेल्या निखाऱ्याला स्पर्श होण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मात्र, मनातील अतूट श्रद्धेपोटी धगधगत्या जळत्या निखाऱ्यावर अनवाणी पावलांनी चालण्याचे अग्निदिव्य भक्तांकडून पार केले जाते. धगधगते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे दृश्य पाहून अंगावर  अक्षरश: काटे येतात. अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर गावात ही अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जात आहे. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळत्या निखाऱ्यावरून भाविक चालत जातात. तरीही कुठली इजा होत नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मळसुर नावाचे गाव आहे. या गावातील अनोखी परंपरेची चांगलीच चर्चा असते. मळसुर गावाचे ग्रामदैवत सुपिनाथ महाराजांचे एक प्राचीन मंदिर आहे. माघ महिन्यात या गावात सुपिनाथ महाराजांच्या पुरातन मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

गावामध्ये सुपिनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या यात्रेत ‘देवाचं लग्नं’ लावण्याची प्रथा आहे. ‘देवाच्या लग्ना’च्या अक्षता पडल्या की भाविकांकडून अग्निपरीक्षा दिली जाते. काल रात्री मळसुर गावात ‘देवाचं लग्न’ या उत्सवानिमित्त भक्त निखाऱ्यावरून चालत गेले. धगधगत्या निखाऱ्यांवरून चालतांना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होते, अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा जोपासण्यासाठी सुरुवातीला मंदिर परिसरात खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर ग्रामस्थ खड्ड्यात लाकडे जाळतात. या जळलेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची गावकऱ्यांकडून विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर मग धगधगत्या निखाऱ्यांवरुन चालत भाविक पुढे जातात. विशेष म्हणजे, या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही, असेही भाविकांचे म्हणणे आहे. ग्रामदैवत सुपिनाथ महाराजांवर ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेतूनच अनोखी व धरारक परंपरा जोपासली जाते.

जोडप्याने घातले जाते साकडे

मळसुर गावाचे ग्रामदैवत सुपिनाथ महाराजांच्या मंदिरात यात्रेच्या दिवशी पती-पत्नीने जोडप्याने साकडे घालण्याची परंपरा आहे. मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीने देवाप्रती कृतज्ञता म्हणून जळत्या निखाऱ्यावरून चालण्याच्या अग्निपरीक्षा दिली जाते. या उत्सवाच्या दिवशी गावातील माहेरवाशिणी गावात माहेरी येत असतात. गावात मोठा यात्रा महोत्सव भरतो. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.