अकोला : एसटी महामंडळाच्या धावत्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये तब्बल २० प्रवासी होते. बस चालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच या प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली.’द बर्निंग बस’ची थरारक घटना अकोला जिल्ह्यातील अकोट ते शहानुर मार्गावर रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानुर हे गाव आहे.
शहानुर ते अकोला एसटी महामंडळाची बस धावते. आज सकाळीच शहानुर येथून बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली. पोपटखेडवरून अकोटकडे बस धावत असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघण्यास सुरुवात झाली.
बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याच्या कडेला बस उभी केली. पुढील अनर्थ लक्षात घेता बस चालकाने सतर्क होऊन बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. क्षणार्धात बसणे मोठा पेट घेतला. एसटी महामंडळाची बस आगीच्या भक्षस्थानी सापडली. बस चालकाला वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी सतर्क होऊन सर्व प्रवाशांचे जीव वाचवले.बसला लागलेली भीषण आग बघता प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीच्या घटनेमध्ये एसटी महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांच्या वस्तू देखील जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली.
एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाचा अंदाज
एसटी महामंडळाच्या बसला लागलेल्या आगीची माहिती अकोटच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत पूर्ण बस आगीमध्ये जळाली. अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नादुरुस्त व जुन्या बसमधून धोकादायक प्रवास
एस टी महामंडळाच्या अकोला विभागातील बहुतांश बस जुन्या झाल्या आहेत. अनेक बसचे वयोमान दहा वर्षापेक्षा अधिक आहे. त्या बसमधून लाखो किलोमीटरचा प्रवास झाला असला तरी त्या अद्यापही प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. नादुरुस्त व जुन्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागतो. आज धावत्या बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे तब्बल २० प्रवाशांचे प्राण वाचले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाने सर्व बसची योग्य देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे.