अकोला : जिल्ह्यातील आपातापा मार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात एकाचा जागीचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले, पोलिसांनी घटनास्थळ गाठण्यात उशीर केल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील आपातापा मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात तीन वाहने एकमेकांवर धडकली. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
आपातापा मार्गावर विद्युत मंडळाचे खांब बसवण्याचे काम सुरू होते. अकोला शहरातून आपातापाकडे जाणारी मालवाहू मोटार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्याचवेळी अकोल्याहून पुढे जाणारी दुसरी प्रवासी मोटार देखील या अपघातावर जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये आपातापा येथील शंकर रामदास बापटे यांचा मृत्यू झाला असून, एका मोटारीच्या चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केले. मृतकास उत्तरीय तपाणीसाठी तसेच जखमींना उपचार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या तीन वाहनांच्या अपघातामुळे आपातापा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
रस्ता बनला काळ
जिल्ह्यातील आपातापा रस्ता अपघात प्रवण मार्ग झाला आहे. अकोला शहरातून दर्यापूर, अमरावतीसाठी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. आपातापा मार्गावरील गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर ट्रॅक्टर व ट्रॉली उभ्या केल्या जातात. मार्गावर उभे ही वाहने दृष्टीस पडत नसल्याने त्यावर इतर वाहने आदळून अपघात होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. या मार्गावर अपघात घडणे नित्याचेच झाले. आतापर्यंत आपातापा मार्गावरील अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर शेकडो जण जखमी झाले आहेत. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघात रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.