अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावाचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. या गावातील एका महिलेला १४ जुलैला रात्री प्रसव वेदना सुरू झाली. महिलेला रुग्णालयात कसे न्यावे, हा प्रश्न कुटुंबीयांपुढे असताना महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथक मदतीसाठी मध्यरात्री धावून आले.
बचाव पथकाच्या जवानांनी खांद्यावरील खाटेवरून पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्या महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक त्या गर्भवती महिलेसाठी अगदी देवदूताप्रमाणे ठरले. अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने पोही ते माना या मार्गावरील उमा नदीला व पोही ते मूर्तिजापूर मार्गावरील तापकाळा नदीला पूर आला. दोन्ही मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने ते मार्ग बंद होते. गावातील पायल अंकुश मुळे या गर्भवतीच्या पोटात दुखायला लागल्याने मूर्तिजापूरला तात्काळ नेणे गरजेचे होते. गावचे सरपंच किशोर नाईक यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे आणि उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली.
हे पथक नेमकेच पंढरपूर येथे सेवा देऊन गावात परतले होते. परंतु, तरीही क्षणाचा विलंब न करता पुन्हा सेवाकार्यासाठी ते रवाना झाले. २५ मिनिटांत घटनास्थळ गाठले. पुलावरुन १५ फूट पाण्याचा प्रवाह सुरू होता. दीपक सदाफळे यांनी नियोजन केले. जवानांच्या खांद्यावर खाट देऊन त्या गर्भवती महिलेला अतिशय खबरदारी घेऊन बाहेर काढले. कुटुंबातील सदस्यांना देखील सुखरुप बाहेर काढले. तात्काळ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल केले.